‘सिकल सेल अॅनिमिया’
सिकल सेल’ या आजाराविषयी सांगणाऱ्या जाहिराती रेडिओवर, टीव्हीवर बऱ्याचदा ऐकायला, पाहायला मिळतात. पण हा आजार नेमका काय असतो, तो कुणाला होण्याची शक्यता अधिक, त्यावर काही उपचार आहेत का, याबद्दल अनेकांना माहिती नसते. १९ जून हा दिवस जागतिक सिकल सेल दिवस म्हणून पाळला गेला. या निमित्ताने या आजाराविषयी-
'सिकल’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ म्हणजे गवत कापण्याचा विळा किंवा कोयता. ‘सिकल सेल अॅनिमिया’ हा लाल रक्तपेशींमधील दोषामुळे होणारा आजार आहे. निरोगी माणसाच्या लाल रक्तपेशींचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली निरीक्षण केल्यास त्यांचा आकार गोलाकार दिसतो. पण सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशी विळ्यासारख्या आकाराच्या, वेडय़ावाकडय़ा दिसतात. या दोषाला ‘सिकलिंग गुणधर्म’ असे म्हणतात. निरोगी माणसाच्या आणि सिकल सेल रुग्णाच्या लाल रक्तपेशींचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर शास्त्रज्ञांना सिकल सेल पेशींमधल्या ‘हिमोग्लोबिन’ प्रथिनात दोष आढळून आला. दोष आढळलेल्या हिमोग्लोबिनला ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’ असे नाव देण्यात आले. या प्रकारच्या हिमोग्लोबिनमुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. त्यामुळे रक्त कमी होते. याच अवस्थेला आपण ‘अॅनिमिया’ म्हणतो. त्यामुळे या आजाराला ‘सिकल सेल अॅनिमिया’ असे नाव पडले. हा आजार पूर्णत: आनुवांशिक आहे. कोणत्याही सूक्ष्म जंतू किंवा विषाणूमुळे किंवा पोषक आहार न घेतल्यामुळे हा आजार होत नाही.
या आजाराचे रुग्ण जगभर सापडतात. पण आफ्रिका, सौदी अरेबिया आणि भारतात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. देशात मध्य भारतात याचे रुग्ण अधिक सापडतात. तसेच हा आजार प्रामुख्याने आदिवासी, दलित आणि इतर मागासवर्गीय समाजांमध्ये आढळतो. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील आनुवंशिक गुणदोष विभागाने राज्यातील विविध जाती- जमातींचे या आजारासाठी सर्वेक्षण केले आहे. तसेच नागपूरचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी विदर्भातील काही जिल्ह्य़ांचे सर्वेक्षण केले आहे. त्या आधारे नंदुरबारमधील भिल्ल व पावरा आणि गडचिरोलीमधील माडिया, गोंड, परधान या आदिवासी समाजांमध्ये सिकल सेलचे प्रमाण सगळ्यांत जास्त असल्याचे दिसून आले आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्य़ांमधल्या दलित समाजातही हा आजार आढळत असल्याचे दिसले आहे. देशभरात या आजाराचे सुमारे दहा लाखांहून अधिक रुग्ण असून महाराष्ट्रात त्याचे सुमारे अडीच लाख रुग्ण आहेत.
हा आजार जनुकीय दोषामुळे होत असल्याने तो आनुवंशिक आहे. आई- वडिलांकडून हा आजार अपत्यांमध्ये येतो. आनुवंशिक शास्त्राच्या नियमांनुसार हा दोष दोन प्रकारांत आढळतो. यातला एक प्रकार म्हणजे ‘सिकल सेल वाहक’ (कॅरिअर) आणि दुसरा म्हणजे ‘सिकल सेल पीडित’ (सफरर). वाहक व्यक्ती ही केवळ आजाराची वाहक असते. या व्यक्तीत आजाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.
व्यक्तीच्या रक्ताची पयोगशाळेत चाचणी केल्यावर या आजाराचे निदान करता येते. वर उल्लेख केलेला ‘सिकलिंग गुणधर्म’ आजाराच्या वाहक आणि पीडित या दोन्ही प्रकारच्या व्यक्तींच्या रक्तात आढळतो. हा गुणधर्म ओळखण्यासाठी रक्ताची ‘सोल्युबिलिटी टेस्ट’ उपयुक्त ठरते. पण व्यक्ती वाहक आहे की पीडित, हे ओळखण्यासाठी रक्ताची आणखी एक चाचणी करावी लागते. या चाचणीला ‘इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट’ म्हणतात. सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये सिकल सेल रक्तदोष तपासणी सुविधा उपलब्ध आहे.
या आजाराच्या रुग्णांमध्ये शारिरिक थकवा, सांधेदुखी, रक्तक्षय, डोळे पिवळसर दिसणे अशी लक्षणे आजाराच्या प्ररंभी दिसतात. काही वेळा पाणथरीचा म्हणजे ‘स्प्लीन’चा आकार वाढलेला आढळतो. ऋतू बदलांमध्ये या आजाराची तीव्रता वाढते. व्यक्तीला थंडी ताप किंवा जुलाब- उलटय़ांसारखा आजार झाला असेल तर शरीराला अतिरिक्त प्राणवायूची गरज भासत असते. अतिश्रम केल्यावरही शरीराला प्राणवायू अधिक लागत असतो. अशा वेळी प्राणवायूच्या कमतरतेमुळे सिकल सेल रुग्णाच्या शरीरातील सिकलिंग प्रक्रिया वाढते. वेडय़ावाकडय़ा सिकल सेल्स रुग्णाच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये अडकतात आणि त्या रक्तवाहिनीतला रक्तपुरवठा खंडित होतो. शरीराच्या ज्या भागात ही प्रक्रिया घडते तिथे रुग्णाला प्रचंड वेदना होतात. वैद्यकीय भाषेत याला ‘क्रायसिस’ असे म्हणतात. अशा वेळी ताबडतोब वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. रुग्णाला क्रायसिस येण्याची ही प्रक्रिया अधुनमधून होत राहते. सतत क्रायसिस येत राहिले तर शरीरातील विविध अवयवांवर विपरित परिणाम होण्यास सुरूवात होते. ही लक्षणे या आजाराच्या रुग्णाला वयाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षांपासून दिसू लागतात. वय वाढते तशी लक्षणांची तीव्रता वाढते.
हा आनुवंशिक आजार असल्यामुळे तो औषधाने बरा होणारा नाही. पण आता वैद्यकीय क्षेत्रात अनेक नवीन शोध लागत आहेत. त्या आधारे पाश्चिमात्य देशांत बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन, जीन थेरपी, स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन अशा आधुनिक उपचारांचा या आजारावर यशस्वी प्रयोग झालेला आहे. या उपचारांनी हा आजार बरा होऊ शकतो. पण हे उपचार खर्चिक असल्याने देशातील सामान्य नागरिकांना ते परवडणारे नाहीत. या आजाराच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा या लक्षणांना दूर ठेवण्यासाठी ‘हायड्रॉक्सिल युरिया’सारखी काही औषधे उपलब्ध आहेत. मात्र ही औषधे खूप महागडी आहेत, तसेच ती आयुष्यभर घ्यावी लागतात. काही आयुर्वेदिक औषधे या आजाराच्या लक्षणांना दूर ठेवण्यात उपयुक्त ठरत असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे. आजाराचे अचूक निदान, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला, योग्य औषधोपचार, पोषक आहार, स्वच्छता याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी योगासने व प्राणायाम यांची जोड दिल्यास या आजाराबरोबरही आयुष्य आनंददायी पद्धतीने जगता येऊ शकते.
या आजार पूर्णपणे बरा करणारे औषध नसल्यामुळेच प्रतिबंधक उपाय करावे लागू शकतात....
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......