दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार
दात वाचवण्यासाठीचे उपचार कसे आधुनिक होत गेले हे पाहूया-
पूर्वी आणि आता
दात किडण्याच्या अवस्था
अवस्था क्र. १. या अवस्थेत कीड ही दाताच्या ‘इनॅमल’ या सर्वात बाह्य़ आवरणापुरतीच मर्यादित असते. अशा वेळी किडलेल्या दातात किंवा दाढेत छोटासा खड्डा म्हणजे ‘कॅव्हिटी’ तयार होते आणि त्यात अन्न अडकत राहते; पण वेदना होत नाहीत. दात किंवा दाढा दुखत नसल्यामुळे या प्राथमिक अवस्थेत रुग्ण दातांचा इलाजही करून घेत नाहीत.
अवस्था क्र. २. यात कीड दातांच्या पुढच्या थरापर्यंत म्हणजे ‘डेंटिन’पर्यंत पोहोचते. या वेळी कॅव्हिटी मोठी झालेली असते. क्वचित दात किंवा दाढ दुखतेही. पण रुग्ण दातात अडकलेले अन्नाचे कण विविध प्रकाराने काढून टाकतात, त्या बाजूने खाण्याचे टाळतात. किडलेल्या दाताचा इलाज करणे या अवस्थेतही टाळलेच जाते.
अवस्था क्र. ३. या अवस्थेत कीड दाताच्या सर्वात आतल्या थरापर्यंत म्हणजे ‘पल्प’पर्यंत किंवा नसेपर्यत पोहोचते. दातातली कॅव्हिटी खूप मोठी झालेली असते. दात ठणकत असतो. रुग्णांना वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात आणि दातांच्या दवाखान्यात धाव घेण्याची वेळ येते.
अवस्था क्र. ४ आता मात्र कीड दाताच्या पल्पमधून मुळांपर्यंत पसरते.
दाताच्या मुळाच्या टोकाशी जंतुसंसर्ग होऊन तिथे गळू होते. चेहऱ्याला सूज येते; क्वचित तापही येतो. दाताला असह्य़ ठणका लागतो. पूर्वी अशा अवस्थेतली दाढ किंवा दात काढण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नव्हता. किडलेल्या दातांवरील उपचार
दात किडला की त्यात सिमेंट नाहीतर चांदी भरून घ्यायची किंवा ‘रूट कॅनाल’ करायचे आपल्याला माहीत असते. पण दातांवरच्या या उपचारांमध्ये गेल्या काही वर्षांत बरीच सुधारणा झाली.
पूर्वीचे आणि आताचे उपचार
दात किंवा दाढ किडण्याची अवस्था दाताचा एक्स-रे काढून कळते. अवस्था कोणती यावरून उपचार काय करायचा हे दातांचे डॉक्टर ठरवतात. किडलेल्या दातांवरील पूर्वीचे उपचार आणि त्या उपचारांच्या अत्याधुनिक आवृत्या पाहूया-
१) दातात भरली जाणारी चांदी
किडलेल्या दाढांच्या उपचारांमध्ये पूर्वी दाढेत झिंक ऑक्साईड आणि लवंगाचा अर्क असलेले सिमेंट भरून नंतर त्यात चांदी भरत असत. पण चांदी भरण्याच्या या इलाजाला काही ठळक मर्यादा होत्या. उदा. दाढ किडण्याच्या पहिल्या दोन अवस्थांपर्यंतच चांदी भरण्याचा उपचार यशस्वीपणे करता येई. चांदीचे फिलिंग काळपट दिसत असल्यामुळे दर्शनी भागातल्या किडलेल्या दातांमध्ये चांदी भरता येत नसे. भरलेली चांदीचे फिलिंग दाढेला चिकटून बसत नाही. त्यामुळे दाढेतला खड्डा फारच मोठा असेल तर त्यात केलेले चांदीचे फिलिंग तुटते आणि दीर्घकाळ टिकत नाही. शिवाय चांदीचे फिलिंग करताना त्यात अगदी अल्प प्रमाणात पाऱ्याचा समावेश असतो. पाऱ्याच्या दुष्परिणामांच्या म्हणजे ‘मक्र्युरी पॉयझनिंग’च्या तथाकथित भीतीमुळेही दातात चांदी भरणे अनेक देशांत बंद होऊ लागले आहे. (असे असले तरी जगातील बहुसंख्य दंततज्ज्ञ मक्र्युरी पॉयझनिंग खूपच नगण्य असून त्याचे दुष्परिणाम होत नसल्याचेच मानतात.)
आधुनिक पद्धतीने दातांचे ‘फिलिंग’-
दातात चांदी भरण्याच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्या जागी एखादे नवीन ‘फिलिंग मटेरियल’ येण्याची गरज जाणवू लागली. ही गरज ‘ग्लास आयनोमर’ आणि ‘कंपोझिट रेझिन’ या दोन फिलिंग मटेरियल्सच्या शोधामुळे पूर्ण झाली. चावण्याच्या बाबतीत या दोन मटेरियल्सची क्षमता जवळपास चांदीच्या फिलिंगच्या क्षमतेइतकीच असते.
शिवाय हे पदार्थ तंतोतंत दाताच्या रंगासारखे दिसतात. त्यामुळे अल्पावधीतच या नवीन फिलिंग मटेरियल्सनी चांदीच्या फिलिंगची जागा घेतली. दातांसारखाच रंग असल्यामुळे दर्शनी भागातील दातांमध्येही ही मटेरियल्स भरता येतात, फिलिंग केले आहे हे कळतही नाही. ही मटेरियल्स दाताला किंवा दाढेला चिकटून बसतात. या गुणधर्मामुळे किडलेला दात कमीत कमी कोरावा लागतो आणि केलेले फिलिंग अधिक काळ टिकतेही. पुढच्या दातांमधील फटी बुजवणे, सदोष आकार असलेल्या किंवा तुटलेल्या दातांचा आकार पूर्ववत करणे, दातावरचे डाग घालवणे, दातांसाठी तात्पुरत्या ‘कॅप’ बनवणे अशा विविध कारणांसाठीही ग्लास आयनोमर आणि कंपोझिट रेझिन ही फिलिंग्ज वापरतात.
२) ‘रूट कॅनाल’ उपचार
(सविस्तर आधिच्या ब्लॉग मध्ये लिहीले आहे)
दोन दशकांपूर्वीपर्यंत दात किडण्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत केवळ दात काढण्याचाच उपाय उपलब्ध होता. मात्र नंतर ‘रूट कॅनाल’ उपचारांद्वारे असा दात किंवा दाढ वाचवता येऊ लागला. दाताचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे दाताचा ‘पल्प’ किंवा रक्तपेशी आणि नसा असलेला मऊ गाभा. जेव्हा या प्लपपर्यंत किंवा नसेपर्यंत कीड पोहोचते तेव्हा तिथे जंतूसंसर्ग होऊन दाताच्या मुळाशी गळू होते आणि असह्य़ ठणका लागतो. अशा वेळी जंतूसंसर्ग झालेली नस किंवा पल्प काढून टाकतात आणि तिथे ‘गटा-पर्चा’ नावाच्या एका मटेरियलचे फिलिंग केले जाते. या उपचाराने जंतूसंसर्ग कमी होऊन ठणका थांबतो आणि दात खूप किडलेला असूनही वाचतो. यालाच ‘रूट कॅनाल’ असे म्हणतात. आजकाल रुट कॅनालसाठी ‘प्रोटेपर’ नावाचे एक आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे रुट कॅनाल उपचार खूप यशस्वीपणे करता येतात.
खूप किडून कुचके झालेले, तुटलेले दात आणि दाढा वाचवण्यासाठी आता आणखी एका मटेरियलचा शोध लागला आहे. या मटेरियलचे नाव आहे ‘फायबर पोस्ट’.
हे मटेरियल खूप कठीण आणि भक्कम- एखाद्या खिळ्यासदृश असते. रूट कॅनाल केलेल्या दाताच्या रुट कॅनालमध्ये हे मटेरियल खोचले किंवा रोवले जाते. या फायबर पोस्टचा एक भाग दाताच्या मुळात जातो, तर उर्वरित भाग दाताच्या कुचक्या आणि तुटलेल्या भागात जातो. अशा प्रकारे हे मटेरियल भिंतीत खोचलेल्या खुंटीसारखे तुटलेल्या दाताला आधार देते. नंतर या फायबर पोस्टवर कंपोझिट रेझिन मटेरियलचे ‘बिल्डअप फिलिंग’ करतात व त्यावरून दातावर ‘कॅप’ बसवतात.
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......