‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?
तोंडात येणारी शेवटची दाढ म्हणजे अक्कल दाढ. वयाच्या १७ ते २५ वर्षांपर्यंत अक्कल दाढ तोंडात येऊ लागते. कधी कधी २५ वर्षांनंतर सुद्धा ही दाढ अचानक तोंडात येऊ शकते.
असे म्हटले जाते की आधीच्या काळात मनुष्याचा आहार हा खूप उग्र प्रकारचा असल्याने दात झिजून जात असत. मग दात झिजल्याने जबड्यात बदल घडून येत. तोंडातील सगळे दात नैसर्गिकरीत्या हालचाल करून घडलेल्या बदलाची भरपाई करत असत. म्हणूनच तरुणपणी तोंडात येणार्या अक्कल दाढेला पुरेशी जागा मिळून दात सहजपणे बाहेर निघून येत असत.
आताच्या काळात आहार मऊ, दातांना त्रास न होणारा असतो. तसेच हल्लीच्या काळात ऑर्थोडोंटिस्टच्या साहाय्याने वाकडे-तिकडे असलेले दात सारखे करण्याची पद्धत खूपच लोकप्रिय झाली असून लहान वयातच मुलांचे दात चांगले दिसावे म्हणून ऑर्थोडोन्टिस्टचा भरपूर वापर केला जातो. यामुळे तरुण वयात येणार्या अक्कल दाढेला जागाच शिल्लक राहात नाही. याचा परिणाम म्हणून अक्कलदाढेसंबंधित समस्या आढळून येतात.
इम्पॅक्टेड दाढ – तोंडात पुरेशी जागा नसल्याने, दातांवरती असलेली हिरडी खूप जाड होऊन दाताला वर येऊ देत नसल्याने, तसेच दातांभोवती असलेले हाड किंवा अक्कलदाढेजवळचा दात येणार्या नवीन दाताला अडवत असल्याने अक्कल दाढ नैसर्गिकरीत्या पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाही,
अशा दाढेला ‘इम्पॅक्टेड दात’ असे म्हणतात.
इम्पॅक्टेड दातामुळे काय होऊ शकते? –
– दात इम्पॅक्टेड असल्यास दाताचा संसर्ग होऊन खूप त्रास होऊ शकतो.
– अशा दातांच्या भोवती सिस्ट होऊ शकते. ती सिस्ट वाढून जबड्याच्या हाडाला निकामी करू शकते. जबड्यातील नसांचा (नर्व्हज्) समावेश त्यात असला तर संवेदना कायमची हरवून जाऊ शकते.
– सिस्ट चा वेळे वर उपचार न झाल्यास ट्युमर होऊ शकतो.
अक्कल दाढ का व कधी काढावी?….
– प्रत्येक अक्कल दाढ त्रासदायक ठरेल असे नाही. पण ८५ टक्के अक्कल दाढा अखेरीस त्रास देऊ लागतात व काढाव्या लागतात.
– अक्कल दाढेभोवती असलेली हिरडी वारंवार जेवण अडकल्यामुळे सुजत असल्यास ती काढणे योग्य.
– अक्कल दाढेमुळे बाहेरच्या भागावर सूज असल्यासही ती काढून टाकावी.
– अक्कल दाढ तोंडात संपूर्णपणे बाहेर आलेली नसेल, ती वाकडी असेल व शेजारच्या दाताला त्रास देत असेल तर तिचा संसर्ग शेजारच्या दाताला होऊन तो किडत असेल तर ती काढून टाकावी.
– एका बाजूने वरची किंवा खालची एकच अक्कल दाढ असेल व दुसरी नसेल तर विरोधी दाताचा दबाव नसल्याने ती अक्कल दाढ हाडाच्या बाहेर हळूहळू येऊन त्रास देऊ शकते. खाण्यासाठीसुद्धा त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने ती काढून टाकणे योग्य ठरेल.
इम्पॅक्टेड अक्कल दाढ कशी काढतात?…
– अक्कलदाढ जर सरळ, पूर्णपणे तोंडात दिसत असली व त्रास देत असली तर ती सहजपणे काढता येते. पण जर ती दाढ पूर्णपणे तोंडात दिसत नसली म्हणजेच इम्पॅक्टेड असली तर एक किरकोळ शस्त्रक्रिया करून ती काढली जाते.
– अनेकजण ‘शस्त्रक्रिये’च्या नावानेच घाबरतात. पण या बाबतीत घाबरण्याचे काहीही कारण नसते.
– ही शस्त्रक्रिया डेन्टिस्टच्या क्लिनिकमध्येच पार पाडली जाते. ही शस्त्रक्रिया डेन्टिस्ट करतात किंवा विशेषज्ञ करतात.
– दात काढण्यापूर्वी एका ‘एक्स-रे’ची गरज असते.
– रुग्ण दाढ काढण्यास आल्यानंतर स्थानिक भूल देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते.
– दात हाडांमध्ये अडकून पडडेला असल्यामुळे दाताभोवतीचे हाड किंचित कापून दाढ काढली जाते. दाढ पण तुकडे करून काढली जाते.
– दाताच्या स्थितीच्या गांभीर्यानुसार शस्त्रक्रियेला १५ मिनिटे ते १ तास लागू शकतो.
– हाडाच्या आत दाताची मूळं असतात. ही मूळं पण वाकडी-तिकडी असल्यास ती काढण्यास अजून जास्त वेळ लागू शकतो.
दातढ काढल्यावर त्या ठिकाणी टाके दिले जातात. हे टाके सात दिवसांनंतर काढून टाकतात.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर काय होते? …
– भूल उतरल्यावर आपल्याला त्रास होणे, दुखणे साहजिक आहे.
– दात काढलेल्या ठिकाणी काही वेळ रक्तस्राव होतो.
– दुसर्या दिवशी तोंडाला सूज येऊन किंचित त्रास होऊ शकतो.
– सूज २-३ दिवस राहू शकते.
रुग्णाकडून काय अपेक्षित आहे?…
– पहिल्या दिवशी ः * भूल दिल्यामुळे तोंडाच्या एका बाजूची संवेदना हरवते. म्हणून त्या बाजूला जणू काहीच नसल्याची भावना निर्माण होते. अशा वेळी आपल्या दातांनी गाल, ओठ किंवा जीभ चावली जाऊ नये याची खूप काळजी घ्यावी.
* डेन्टिस्टने सुचविल्याप्रमाणे तोंडाला बाहेरून बर्फ लावला पाहिजे.
* तोंडात कोणताही दुसरा कापूस किंवा कपडा घालू नये.
* दात काढलेल्या दिवशी काहीही चावण्यास व गरम खाण्यास मनाई असते याची नोंद घ्यावी.
* ४५ मिनिटां नंतर कापूस काढून टाकून थंड काही खाऊन किंवा पिऊन घ्यावे. (आईसक्रीम, ज्यूस, थंड सूप, थंड कंजी) व त्यानंतर डेन्टिस्टने सांगितल्याप्रमाणे औषधे घेणे चालू करावे. औषधे जेवढ्या दिवसांसाठी घेण्यास सांगितले जाते तेवढ्या दिवसांसाठी प्रामाणिकपणे घ्यावीत.
* तोंडात रक्त आल्यास परत परत बाहेर थुंकू नये. तर ते गिळून घ्यावे.
* हाड कापून दाढ काढल्यामुळे तोंड उघडण्यास खूप त्रास होणे साहजिक आहे. म्हणून आपण तोंड उघडण्याचा व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे स्नायू सुटसुटीत होऊन तोंड उघडण्यास मदत होते.
– दुसर्या दिवशी ः * दुसर्या दिवसापासून मऊ खाणे चालू करू शकतो. शक्यतो दुसर्या बाजूने खावे.
* कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. (किमान दिवसातून २ वेळा व ५ दिवसांपर्यंत)
* भरपूर पाणी प्यावे.
* दात काढल्यावर सिगारेट किंवा दारू पिणे तसेच तंबाखू खाण्यास सक्त मनाई आहे. असे केल्यास जखम भरण्यास व्यत्यय येऊन अधिक त्रास होऊ शकतो.
७ (सात) दिवसांनंतर टाके काढण्यासाठी व तपासणीसाठी डेन्टिस्टकडे जाणे खूपच महत्त्वाचे
हे लक्षात ठेवा ः
* दात काढून झाल्यावर उशिरापर्यंत रक्तस्राव न थांबल्यास ताबडतोब डॉक्टरांना म्हणजेच डेन्टिस्टला भेटावे.
* तोंड उघडण्यास खूपच त्रास होत असेल तर डेन्टिस्टला दाखवावे.
* दात काढलेल्या बाजूची भूल उतरल्यावर सुद्धा संवेदना हरवल्याची जाणीव कायम असेल तर डेन्टिस्टला दाखवावे.
* दोन दिवसांनंतरही सूज अजिबात कमी झाली नाही तर डेन्टिस्टना दाखवावे.
* दिलेल्या औषधांमुळे कुठल्याही प्रकारची ऍलर्जी किंवा दुष्परिणाम झाल्यास ताबडतोब डेन्टिस्टचा सल्ला घ्यावा.
* निरोगी राहण्यासाठी पौष्टीक आहार चालू ठेवला पाहिजे.
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......