हिरड्यांचे आजार व त्यावरील आधुनिक उपचार
जसे किडल्यामुळे दात काढावे लागतात; तसेच खराब हिरड्यांमुळे दात काढावे लागतात. मात्र, आजकाल किडल्यामुळे काढाव्या लागणार्या दातांचे प्रमाण (रूट कॅनाल-क्राऊन-कम्पोझिट रेक्झिनची फिलिंग्ज इत्यादी आधुनिक उपचारांमुळे) कमी झाले आहे. मात्र, खराब हिरड्यांमुळे काढाव्या लागणार्या दातांचे प्रमाण काहीअंशी वाढलेच आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, एकोणीस वर्षांपर्यंतच्या सुमारे 60 टक्के लोकांना हिरड्यांचे काही आजार झाल्याचे आढळले आहे. तर चाळिशीच्या वयोमानापर्यंत खराब हिरड्यांचे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत गेल्याचे आढळले आहे. याशिवाय भारतीय आणि श्रीलंकेच्या लोकांत ‘हिरड्यांचे बळावलेले आजार झपाट्याने वाढत आहेत,’ असा धोक्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
हिरड्या आणि दंत परिवेस्टनकोश (पेरियोडोन्शियम)
हिरड्या या दाताभोवती एखादे संरक्षक कवच असावे, त्याप्रमाणे दाताला घट्ट लपेटून-लगडून-चिकटून असतात. निरोगी हिरड्या या घट्ट, गुलाबी आणि दाताच्या बाह्य भागापर्यंत म्हणजेच क्राऊनपर्यंत दाताला चिकटलेल्या असतात. निरोगी हिरड्यांखालचे हाडही निरोगीच असते आणि ते दाताच्या बाह्य भागापर्यंत- क्राऊनपर्यंत- दाताच्या सभोवताली अस्तित्वात असते. अशा या निरोगी हाडाची खोबण तयार होऊन, या खोबणीत दाताचे मूळ भक्कमपणे रुतलले असते. दाताचे मूळ आणि हाडाची खोबण यांना एकमेकांशी बांधून ठेवणारे-जोडणारे असे काही धागे- पेरिओडोंटल फायबर्स- दाताच्या सभोवताली असलेली हिरडी आणि हाडाची खोबण व हाडाच्या खोबणीतील मुळाभोवतीचे धागे या सर्वांना ‘दंत-परिवेस्टनकोश’ (पेरियोडोन्शियम) असे म्हणतात.
हिरड्यांचे आजार :
हिरड्यांचे आजार हे सर्वसाधारणपणे दोन गटांत विभागता येतात. हिरड्यांचे सर्वसाधारण आजार (जिन्जिव्हायटिस)
ज्यामध्ये केवळ हिरड्यांपर्यंत मर्यादित असलेली सूज, हिरड्यातून रक्त येणे, हिरड्यात कचरा साठून पू निर्माण होऊन हिरड्यांचा पायोरिया, जिन्जिव्हायटिस होणे इत्यादी आजार होतात.
हिरड्यांचे बळावलेले आजार (पेरियोडोंटयटिस) :
जेव्हा आजार केवळ हिरड्यांपुरताच मर्यादित न राहून हिरडीभोवतीच्या ‘दंतपरिवेस्टना’पर्यंत म्हणजेच हिरडी, हाडाची खोबण, दाताभोवतीचे धागे इ. पोहोचतो, तेव्हा अशा अवस्थेस ‘हिरड्यांचे बळावलेले आजार’ किंवा ‘अॅडव्हान्स जिन्जायव्हल डिसिजेस’ वा ‘पेरियोडोंटायसिस’ म्हणतात. या बळावलेल्या आजारात, दाताच्या मुळाभोवतीच्या हाडाची खोबण झिजत जाते. मुळाला असणारा हाडाचा आधार कमजोर होऊन दाताचा बाह्यभाग- क्राऊन- हा मुळापेक्षा लांब दिसू लागतो आणि दात हलायला लागतात- दात काढण्याची वेळ येते. हिरड्यांचे बळावलेले आजार हे अशाप्रकारे खरोखरच दाताच्या मुळावरच येतात आणि तोंडातून दात गमाविण्याची वेळ रुग्णावर येते.
हिरड्यांच्या आजाराची लक्षणे :
1) हिरड्यांतून रक्त येणे - हिरड्या मऊ, लिबलिबित होऊन नुसता स्पर्श झाला तरी त्यातून रक्त येणे.
2) एरवी ज्या हिरड्या दातांना घट्ट चिकटलेल्या आढळतात, त्याच दातापासून विलग झालेल्या-सैल झालेल्या आढळतात.
3) हिरड्यांचा गुलाबीपणा जाऊन त्या लालभडक, सुजलेल्या अणि सळसळणार्या वा दुखर्या होतात.
4) तोंडाला दुर्गंधी येते.
5) हिरड्यांतून पू येऊ लागतो. (पायोरिया होतो.)
6) हिरड्यांच्या बळावलेल्या आजारात दात हलायला लागतात आणि त्यामुळे दातांची नेहमीची रचना बदलून दातांमध्ये फटी निर्माण होतात वा एरवी जे दात एकमेकांना चिकटून बसलेले असतात, ते एकमेकांपासून विलग झालेले आढळतात. हाडाची खोबण झिजल्यामुळे, हिरड्याही झिजतात, त्यामुळे दाताच्या बाह्यभाग- क्राऊन - नेहमीपेक्षा लांबलचक झालेला असतो. या सर्व घडामोडीला ‘दातांची विकृत हालचाल’ किंवा ‘पॅथॉलॉजिकल मायग्रेशन’ असे म्हणतात.
हिरडीच्या आजारांवरील उपचार :
हिरडीच्या सर्वसाधारण आजारामध्ये- जिन्जिव्हायटिसमध्ये- दाताच्या आणि हिरडीमध्ये प्लाक (जीवाणू व अन्नकणांनी तयार झालेल्या, साध्या डोळ्यांनी न दिसणारा असा एक थर) किंवा टार्टर व कॅल्क्युलस (किटण व कचरा) आढळतो. या प्लाक व टार्टरचा साचलेला थर काढण्याच्या उपचारांना दात साफ करणे (स्केलिंग) असे म्हणतात.
दात साफ करताना हिरडीमध्ये साचलेला कचरा, तसेच दातावर जमा झालेले डाग (चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सिगारेट, विडी, पान-तंबाखू इत्यादींमुळे तयार झालेले- डाग) सुद्धा काढले जातात. या क्रियेला ‘स्केलिंग व पॉलिशिंग’ असे म्हणतात.
जिन्जिव्हायटिस वा हिरड्यांची सूज या हिरड्यांच्या सर्वसाधारण आजारामध्ये नुसत्या हिरड्या साफ करण्याने काम भागते. जेव्हा हिरड्यांत कचरा साठून जंतूंमुळे त्यातून पू येत असतो- पायोरिया- अशावेळी मेट्रोनिडॅझोल, व्हिटॅमिन सी, टेट्रासायक्लीन, जंतुनाशक गुळण्या करण्याची औषधे, हिरड्यांना मालिश करण्यासाठीची विविध गमपेंटस् इत्यादी औषधांनी आणि खूप सखोल व परिपूर्ण अशा दात साफ करण्याच्या- स्केलिंग- उपचारांनी पायोरियाचा आजार आटोक्यात आणता येतो. मात्र, अशावेळी पेशंटने आपल्या अयोग्य सवयीदेखील बलदाव्या लागतात.
सतत पान खाणे, तंबाखू चघळणे, विडी-सिगारेट ओढणे, दातांना मिश्री लावणे, गुटखा-पानमसाला खाणे, सतत सुपारी, मसाला सुपारी खाणे इत्यादी अयोग्य सवयी या केवळ आशियाई वा भारतीय- पाकिस्तानी-श्रीलंकेच्या नागरिकांतच जास्त अधिक्याने आढळतात. या अयोग्य सवयी बंद केल्या आणि दात व्यवस्थित घासले तरच गोळ्या, औषधे आणि स्केलिंग उपचाराने केलेल्या इलाजांचा पायोरियासारखे आजार बरे करण्यात प्रभावी उपयोग होतो. हिरड्या साफ करण्यासाठी जो स्केलिंग नावाचा इलाज केला जातो, त्यासाठी ध्वनिकंपनावर आधारित असे ‘अल्ट्रासॉनिक स्केलिंग मशीन’ आजकाल उपलब्ध असते, त्यामुळे दात साफ करण्याचे काम वेदनारहित आणि वेगवान झाले आहे.
हिरड्यांच्या बळावलेल्या आजारांचे (अॅडव्हान्स्ड पेरियोडोंटल डिसिजेस) उपचार :
हिरड्यांच्या सर्वसाधारण आजारापेक्षा हिरड्यांच्या बळावलेल्या आजाराचे स्वरूप अधिक गंभीर व धोकादायक असते. कारण, या आजारामध्ये दाताच्या ‘दंतपरिवेस्टनकोशापर्यंत’ (पेरियोडोन्शियमपर्यंत) आजार पोहोचलेला असतो. हाडाची व हिरड्यांची झीज होऊन, दाताच्या मुळाचा आधार कमी झाल्याने दात हालू लागलेले असतात. दाताच्या रचनेत बदल होऊन, दाताची विकृत हालचालही झालेली असते.
अशावेळी केवळ हिरड्या व दात साफ करून, दातातले कीटण-कचरा स्केलिंग उपचाराने काढून आणि गोळ्या-औषधे घेऊन काम भागत नाही, तर कित्येकदा हिरड्यांवर छोटी शस्त्रक्रिया करावी लागते. झिजलेल्या आणि नाहीशा झालेल्या हाडाच्या जागी हाडाची भर घालावी लागते. हाडाची भर घालण्याच्या शस्त्रक्रियेला ‘बोन ग्राफ्टिंग’ची शस्त्रक्रिया ही दंतपरिवेस्टनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेले पेरियोडेंटिस्ट तज्ज्ञ दंतवैद्य करतात. त्यासाठी खराब झालेल्या हिरड्या उलगडून हिरड्यांच्या आतील मुळावरील कचरा काढून, दातांचे मूळ गुळगुळीत करावे लागते. (रूट प्लेनिंग) आणि नंतर साफ केलेल्या हिरड्या आणि दातांचे मूळ यांच्यामध्ये हाडाच्या भुकटीचे मिश्रण भरले जाते. या क्रियेला ‘बोन ग्राफ्टिंग’ असे म्हणतात.
विविध प्रकारचे ‘बोन ग्राफ्ट’ आजमितीला उपलब्ध आहेत. त्या-त्या रुग्णाच्या माकडहाडाच्या उंचवट्यापासूनदेखील बोन ग्राफ्टसाठी हाड मिळवता येते. (पण ही पद्धत खूपच किचकट आणि अवघड असल्यामुळे विशेष प्रचारात नाही.) किंवा काही विदेशी कंपन्यांनी बनविलेले खास तयार असे बोन ग्राफ्टही वापरता येतात. हिरडी व दाताचे मूळ यामध्ये बोन ग्राफ्ट भरल्यानंतर हिरडी पुन्हा पूर्ववत शिवून टाकली जाते. अशाप्रकारे हाडाची भर घातल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या नैसर्गिक हाडाशी या शस्त्रक्रियेद्वारे भरलेले हाड एकजीव होते आणि तिथे नव्याने हाड तयार होऊन, दाताला पुन्हा एकदा हाडाचा भक्कम आधार मिळू शकतो.
कित्येकदा खूप हलणार्या दातांसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या ‘फायबर-स्प्लिंट’ तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये फायबर ग्लास मटेरियलचे पातळ असे एकावर एक असे पाच-सहा थर दातावर लावून, त्या थरांवर निळ्या-दृश्य-प्रकाशझोताखाली ‘काम्पोझिट रेनि’चे मटेरियल चिकटवले जाते, त्यामुळे हलणारे दात एकमेकांना छान जोडले जातात आणि अशा प्रकारे तयार झालेल्या ‘फायबर -स्प्लिंट’मुळे दाताचे हलणे थांबविता येते.
यावर उल्लेख केलेल्या हिरड्यांच्या अतिप्रगत शस्त्रक्रिया या दंतपरिवेष्टन शास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच कराव्या लागतात. त्यांना खर्चही साध्या स्केलिंग उपचारापेक्षा खूप येतो आणि या शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पेशंटच्या सवयींचा सहभागही खूप मोठा असतो हे लक्षात ठेवावे.
1) हिरड्यांचे आजार होऊच नयेत म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये दात ब्रश-पेस्टने साफ करणे, चुळा भरणे आणि वेळोवेळी प्लॉसिंग करणे ही तीन महत्त्वाची सूत्रे आहेत.
2) हिरड्या खराब होण्यामागे दात घासण्यासाठी वापरण्यात येणार्या खरखरीत, दाणेदार पावडरी, मिश्री (तंबाखू जाळून करण्यात येणारी पूड) यांचा सहभाग खूपच अधिक आहे. अशा पावडरी-मिश्री यांचे दाणेदार कण, हिरडी आणि दात यांमध्ये अडकून बसतात आणि किटण व कचरा निर्मितीस चालना मिळते. म्हणूनच खरटरीत पावडरी, मिश्री यांचा वापर टाळायला हवा.
3) भारतीय लोकांत हिरड्या खराब होण्याचे प्रमाण वाढण्याचे अत्यंत प्रमुख कारण म्हणजे सतत पान-सुपारी-पानमसाला- गुटखा- तंबाखू षाणे, सिगारेट-विडी ओढणे इत्यादी सवयी! मिश्री-विडी-पान- सुपारी गुटखा - तंबाखू या तर तद्दन भारतीय सवयी आहेत. या सर्व सवयींमुळे ‘क्षणकाळापुरती येणारी किक’ सोडली, तर अन्य कोणताही फायदा ाहेत नाही. तोटे मात्र शंभर टक्के आणि ‘सबम्युक्स फायब्रोसिस,’ ‘कॅन्सरसारखे’ गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. सतत चघळत राहिलेल्या पान-सुपारी-गुटख्याचे कण हिरडी आणि दातामध्ये अडकून राहतात आणि अनायासेच हिरड्या खराब व्हायला मदत होते. म्हणूनच या अयोग्य सवयी टाळल्यास हिरड्या खराब होण्यापासून वाचू शकतात.
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......