दातांचे उपचार आणि त्यामागचे गैरसमज

छान चवीचे पदार्थ खायला सर्वानाच खूप आवडतात. पण खाऊन झाल्यावर खळखळून चूळ भरणे, गुळण्या करणे, सकाळप्रमाणेच रात्री झोपतानाही ब्रशने दात घासणे या साध्या गोष्टींचा मात्र अनेकांना आळस असतो. रोज अशा लहान लहान बाबींची काळजी घेतली तर दाताच्या समस्या उद्भवणारच नाहीत. पण कधी दातांच्या डॉक्टरांकडे जायची वेळ आलीच तरी गैरसमजांमुळे किंवा नाहक भीतीमुळे ते टाळणारे किंवा पुढे ढकलत राहणारे लोक अनेक दिसतात. दातांच्या डॉक्टरांकडे जायचे म्हटले की भीती का वाटते, काय असतात हे गैरसमज....

गैरसमज १) वरचे दात काढल्यावर डोळे कमजोर होतात.

सत्य- पूर्वी दात काढण्याची वेळ सहसा वयस्कर व्यक्तींवर यायची. चाळिशीच्या आसपास उद्भवलेली दातांची दुखणी, त्यामुळे काढावे लागलेले दात आणि साधारणपणे त्याच वेळी लागलेला चाळिशीचा चष्मा या तीन गोष्टी योगायोगाने एकत्र आल्यामुळे वरचे दात काढल्यावर डोळ्यांवर वाईट परिणाम होतो असा समज रूढ झाला असावा. खरे म्हणजे दातांच्या आणि डोळ्यांच्या शिरा पूर्णत: वेगळ्या असतात. त्यामुळे दात काढण्याचा डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही.


गैरसमज २) दातांची स्वच्छता करून घेतली तर दात सैल होतात.

सत्य- दातांच्या भोवती असणाऱ्या हिरडी आणि हाडांच्या मजबुतीवर दातांचा मजबूतपणाही अवलंबून असतो. दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले तर दात व हिरडय़ांभोवती ‘टारटर’ आणि ‘प्लाक’ म्हणजे जंतूंचा थर जमतो. हे जंतू हिरडय़ा व दातांची झीज करू लागतात आणि दातांमधली फटही वाढवतात. दातांचे डॉक्टर रुग्णाच्या दातांची स्वच्छता करताना हा थर दूर करतात. दात व हिरडय़ांवर जमलेला थर दूर झाला की दातांमधली फट नीट दिसू लागते आणि दात सैल झाले की काय, असा रुग्णांचा समज होतो. पण हा थर काढल्यामुळे दातांच्या पुढच्या समस्या टळतात. खरे म्हणजे प्रत्येकाने सुरूवातीपासूनच आपल्या दातांची योग्य निगा राखली तर डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घ्यायची वेळच येणार नाही.


गैरसमज ३) दातांमधील कीड काढून दात भरून घेतल्यावर ते पुन्हा किडत नाहीत.

सत्य- दातांमधली कीड काढली की त्यात ‘फिलिंग’ भरले जाते. पण पुढच्या काळात मौखिक आरोग्य चांगले ठेवले नाही तर दात पुन्हा किडू शकतात. कारण फिलिंग भरलेले असले तरी दातांमधील नसा
आणि रक्तवाहिन्या जिवंत असतात. त्यामुळे प्रसंगी विशिष्ट प्रकारच्या ब्रशचा वापर करून दात स्वच्छ ठेवणे फायद्याचे ठरते.


गैरसमज ४) दाताच्या डॉक्टरांकडे एकदा गेल्यावर उपचारांची जंत्रीच सुरू होते.

सत्य- साधारणपणे आपल्या तोंडात २८ दात असतात. खूपदा रुग्ण एखादा दात दुखत असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो. त्या वेळी त्याच्या इतर एखाद्- दुसऱ्या दातालाही किडण्याची समस्या असू शकते. पण दुसरा दात दुखत नसल्यामुळे रुग्णाचे त्याकडे लक्ष गेलेले नसते. तपासणीत ती आधीपासूनच असलेली समस्या दृष्टीस पडते आणि एका दातामागोमाग इतरही दातांवर उपचार करून घेणे मागे लागले, असा रुग्णाचा समज होतो.


गैरसमज ५) दुधाचे दात आपोआप पडून नवीन येणारच असतात, त्यामुळे दुधाच्या दातांची निगा राखणे आवश्यक नाही.

सत्य- दुधाचे निरोगी दात हा पक्क्य़ा दातांचा पाया असतो. हल्ली फास्ट फूड आणि गोळ्या- चॉकलेट अति प्रमाणात खाल्ले गेल्यामुळे लहान मुलांचे दुधाचे दात लवकर किडतात. हे दात किडून तिथे वेदना होऊ लागल्यामुळे मूल नीट खाऊ शकत नाही. यावर सोपा उपाय म्हणजे बाळाला पहिला दुधाचा दात आला की त्याचे दात आणि तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे. मूल थोडेसे मोठे झाले की त्याला सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश- पेस्टने दात घासण्याची सवय लावणे.


गैरसमज ६) ब्रशपेक्षा दंतमंजन आणि बोटांच्या साहाय्याने दात स्वच्छ करणे चांगले.

सत्य- दातांच्या मध्ये अनेक फटी असतात. दाढांच्या वरच्या भागावर नैसर्गिक उंचवटे, खोलगट भाग आणि चिरा असतात. या ठिकाणी अन्नकण अडकून राहतात. ब्रशचे ब्रस्टल्स या कान्याकोपऱ्यात पोहोचून अडकलेले अन्नकण स्वच्छ करतात. बोटांच्या साहाय्याने दात घासल्यासारखे वाटले तरी अन्नकण साफ होतीलच असे नाही. पण पावडर आणि बोटांनी हिरडय़ांना मसाज करणे फायद्याचे ठरते आणि ब्रशने दात घासून झाल्यावर ते जरूर करावे.


गैरसमज ७) ब्रश वापरल्यामुळे हिरडय़ांमधून रक्त येते.

सत्य- हिरडय़ांमधून रक्त येणे हे ‘पायोरिया’ या दंतरोगाचे लक्षण असू शकते. दाताभोवती साचलेले कीटण या रोगासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरते. कीटण साचल्यामुळे हिरडय़ा सुजतात व लालसर आणि सैल होतात. अशा हिरडय़ांवर ब्रश फिरवला की रक्त येते आणि रुग्णाला ब्रश वापरणेच सोडून द्यावेसे वाटते. अशा वेळी ब्रशऐवजी बोटांनी दात घासले तर कदाचित हिरडय़ांमधून रक्त येणार नाही पण बोटांनी कीटण स्वच्छही होत नाही. अशा वेळी दंतवैद्यांकडून दात व हिरडय़ांची तपासणी करून घेऊन गरज असल्यास दातांची स्वच्छता (स्केलिंग) करून घ्यावी. हिरडय़ांवरील कीटण काढून टाकल्यावर ब्रशने दात नक्कीच घासता येतील.


गैरसमज ८) दातांचे उपचार करून घेताना फार वेदना होतात.

सत्य- योग्य रित्या भूल देऊन दातांचे सर्व उपचार वेदनारहित पद्घतीने होऊ शकतात. दातांमध्ये देण्याच्या इंजेकशनची सुईही आता ‘मायक्रो नीडल’ प्रकारची वापरतात. हिरडय़ांवर विशिष्ट प्रकारचे जेल किंवा स्प्रे वापरून सुई टोचण्याआधी हिरडय़ा बधिर करता येतात. त्यामुळे सुई टोचली तरी टोचल्याची संवेदना जाणवत नाही. लेसर उपचारपद्धतीसारख्या आधुनिक पद्धतीही आता अगदी रुढ झाल्या आहेत.


गैरसमज ९) गरोदर स्त्रीने दातांचे उपचार टाळावेत.

सत्य- गरोदर स्त्रीने गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत दात स्वच्छ करून घेणे, फिलिंग करणे असे बेसिक उपचार करून घेण्यास हरकत नसते. एक्स- रे काढणे, दात काढून घेणे असे उपचार आणि गोळ्या- औषधे घेणे शक्यतो टाळावे. गरज असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठरवावे. गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या तिमाहीत मात्र दातांवरील उपचार आणि औषधे टाळावीत. तरीही उपचारांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करूनच निर्णय घेणे
आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

‘अक्कल दाढ ’ - 'का' , 'कधी' आणि 'कशी' काढतात?

दात बसवणे- प्रकार आणि पद्धती ( कॅप, ब्रीज वर्क, इंप्लांट इ. )

दात कीडण्याचे टप्पे आणि उपचार