काळजी घ्या दातांची…. दुधाचे दात का महत्त्वाचे?
‘दुधाचे दात’ ज्यांना आपण ‘बाळ दात’सुद्धा म्हणतो, ते निरोगी असणे खूप महत्त्वाचे असते. दुधाचे दात मुलांच्या तोंडात ६-१० वर्षांपर्यंत टिकले पाहिजेत, म्हणजे जोपर्यंत त्यांचे नवीन प्रौढ दात तोंडात येत नाहीत.
दुधाच्या दातांचे महत्त्व :-
दुधाचे दात हे फक्त खाण्यासाठी व चावण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठी व शब्द उच्चारणासाठीसुद्धा मदत करतात. त्याचप्रमाणे दुधाचे दात आपल्या जबड्यात नवीन प्रौढ दातांसाठी जागा तयार करतात. दुधाचे दात मुलांच्या तोंडात फख्त काही वर्षांपर्यंतच टिकतात. त्यानंतर आपल्या वेळेप्रमाणे ते नैसर्गिकरीत्या आपोआपच गळून पडतात. जर का वेळेआधीच हे दात काही कारणांमुळे खराब झाले किंवा ते काढून टाकले अथवा गळून पडले तर या दातांच्या बाजूला असलेले दुधाचे दात काढलेल्या दातांच्या जागेत हळूहळू वाकू लागतात. या प्रकारामुळेच पुढे येणार्या नवीन प्रौढ दातांसाठी लागणारी जागा नष्ट होते. या कारणाने प्रौढ दात सरळ येण्याऐवजी वाकडे-तिकडे, पुढे-मागे येऊ लागतात.
दुधाच्या दातांची काळजी घेणे खूपच आवश्यक आहे. त्यासाठी आपण मुलांना हानपणापासून दात निरोगी ठेवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावणे खूप गरजेचे आहे. दातांची व्यवस्थित काळजी न घेतल्याने दात किडून मुलांना खूप त्रास भोगावे लागू शकतात. किडलेल्या दातांकडे दुर्लक्ष केल्यास दात दुखणे, दातांना संसर्ग होऊन सूज येणे असे प्रकार घडतात. मुलांमध्ये सहजपणे दिसून येणारी समस्या म्हणजे ‘नर्सिंग बॉटल डिके’ होय. या प्रकारामध्ये मुलांचे जवळजवळ सगळेच दात किडतात. ठळकपणे वरच्या जबड्यातील समोरचे दात. याला ‘नर्सिंग बॉटल डिके’ म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे दुधाची बाटली. लहान बाळांना दूध, फळाचा रस किंवा इतर काही गोड द्रव्य पदार्थ पाजण्यासाठी आपण बाटली वापरतो. रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपी जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे नष्ट होतात.
दुधाच्या दातांकडे दुर्लक्ष केल्यास ते कधी कधी उपाय करण्यापलीकडे किडून खराब होतात. काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळल्या तर दुधाचे दात आपण निरोगी राखू शकतो…
१. अगदी लहान बाळाला दात नसताना, दूध पाजल्यावर बाळाच्या हिरड्या स्वच्छ ओल्या कपड्याने साफ केल्या पाहिजेत.
२. बाळाच्या तोंडात पहिला दात बाहेर निघताच दात ब्रश करण्यास सुरुवात केली पाहिजे. लहान बाळांसाठी ‘फिंगर ब्रश’ उपलब्ध आहे.
हा ब्रश ‘सिलीकॉन’पासून बनवलेला असतो. ‘सिलीकॉन ब्रश’ आपण वापरल्यावर उकळत्या पाण्यात टाकून स्वच्छ केला पाहिजे. ‘फिंगर ब्रश’ आपल्या बोटाला लावून बाळाचे दात ब्रश करता येतात. लहान मुलांना चूळ भरता येत नसल्याने शक्यतो टूथपेस्टचा वापर करू नये. टूथपेस्टचा वापर दोन वर्षांनंतरच सुरू करावा.
३. दात नसलेल्या जागी बाळाच्या हिरड्यांना दररोज आपल्या बोटाने मसाज करावा.
४. मुलांच्या तोंडात काही दात निघाले की मग मुलांसाठी बाजारात येणारे सॉफ्ट ब्रित्सल ब्रश वापरण्यास सुरवात करता येते.
५. दोन ते अडीच वर्षांपर्यंत मुलांना सगळे दुधाचे दात तोंडात येतात. या वेळेपासून ‘फ्लोसिंग करण्यास सुरुवात केली तर चांगले असते. मुलांना त्याची हळूहळू सवय होऊ लागते. दातांमध्ये अडकलेले खाद्यपदार्थ ‘फ्लॉस’ वापरल्याने सहजपणे निघून बाहेर येतात.
६. रात्रीच्या वेळेस मुलांना गोड द्रव्य पदार्थ, दूध, फळांचा रस वगैरे बाटलीत घालून पाजू नये. रात्रीच्या वेळेस मुलांना कम्फर्टरची गरज भासली तर त्यांना पॅसिफायर द्यावा. पॅसिफायरचा वापर आपल्या डेन्टिस्टच्या सल्ल्यानेच करावा. पॅसिफायरला गोड पदार्थ लावून त्याचा वापर करू नये. त्यामुळे दातांना हानी होते.
७. साखरेचं पाणी किंवा कोल्ड ड्रिन्क्स बाटलीत घालून मुलांना देऊ नये.
८. आपण आपल्या घरात वापरणार्या पाण्याची तपासणी करून घेतली पाहिजे. पाण्यात स्वीकृत मर्यादित असे फ्लोराईडचे प्रमाण असले पाहिजे. फ्लोराईड दात किडणे कमी करते. त्याचबरोबर फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्यास दातांना नुकसान होऊ शकते. दातांवर पांढरे किंवा तपकिरी रंगाचे पॅचेस होऊन दात खराब होऊ शकतात. अशा प्रकाराला ‘फ्लोरोसिस’ म्हणतात. मुलांना जर फ्लोराईडची कमतरता भासते तर दात निरोगी राखण्यासाठी डेन्टिस्ट फ्लोराईड ट्रीटमेंट करतात. आपल्या डेन्टिस्टकडून याबद्दलची माहिती करून घ्यावी.
९. काही न टाळता येणार्या कारणांमुळे दुधाचे दात काढावे लागले किंवा वेळेआधीच ते गळून पडले तर नवीन येणार्या प्रौढ दातांसाठी जागा जपून ठेवण्यासाठी डेन्टिस्ट ‘स्पेस मेंटेनर’ असे अप्लायन्स देतात. स्पेस मेंटेनर बाळांच्या तोंडात नवीन प्रौढ दात येईपर्यंत ठेवतात. त्यानंतर ते काढून टाकतात.
१०. अनेकदा मुलांच्या तोंडात प्रौढ दात येऊ लागतात तरी दुधाचे दात अद्याप पडलेले नसतात. अशा वेळी डेन्टिस्टकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने ते दात काढून टाकावे लागतात. कारण जर नवीन दात येऊनसुद्धा दुधाचे दात त्यांच्या जागीच राहिले तर नवीन दात वाकडे-तिकडे येऊ लागतात.
११. मुलं एक वर्षाची होताच त्यांना डेन्टल चेकअपसाठी घेऊन गेले पाहिजे. दुधाच्या दातांच्या कुठल्याही समस्या असल्यास त्वरित त्यांचे समाधान डेन्टिस्टकडे जाऊन करून घेतले पाहिजे.
मुलांचे दुधाचे दात व हिरड्या निरोगी असल्या तर आणि तरच त्याचे येणारे नवीन प्रौढ दातसुद्धा निरोगी राहतात.
Comments
Post a Comment
Welcome to Asнωαℑïт's のental Clinic......